ओबीसी आरक्षणाबाबत मोठी बातमी! २९ जूनला….

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर आमच्या आरक्षणात वाटेकरी नको, अशी भूमिका घेत ओबीसी नेत्यांनीही दंड थोपटले.

सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचे तत्काळ कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही वडीगोद्री इथं आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं आश्वासन देत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांचे उपोषण मागे घेण्यात यश मिळवलं होतं.

या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून २९ जून रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.सरकारकडून राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना २९ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

या बैठकीसाठी राज्यभरातील अनेक ओबीसी संघटनांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीला नेमके कोणकोणते नेते उपस्थित राहतात आणि या बैठकीच्या माध्यमातून आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.