उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनविण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही तयार होईल अशी शक्यता कमी असताना आज विधानभवनाच्या लिफ्टमध्ये एकाचवेळी फडणवीस आणि ठाकरे एकत्र आल्याने राज्यात नवीन समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी त्यात काडी टाकली आहे. आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही. महाविकास आघाडी टिकणे शक्य नाही हे स्पष्ट झाले असून त्याची सुरुवात आजपासून झाली आहे, असे शिरसाट म्हणाले.
ज्याप्रकारे सरकारसाठी शेवटचे अधिवेशन आहे, तसेच महाविकास आघाडीसाठी देखील एकत्र राहण्याचे शेवटचे अधिवेशन आहे. संजय राऊत यांना नेमका कोणाचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून हवा हे आधी त्यांनी ठरवायला हवे. त्यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून हवे असतील तर हा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारेल असे वाटत नाही, असे शिरसाट म्हणाले.