अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भरदिवसा चोरीचे प्रकार उघडकीस येत आहे. असाच एक प्रकार इचलकरंजी शहरात उघडकीस आलेला आहे. इचलकरंजी येथील सांगली रोडवर आसरानगर येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने लांबवले. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची वर्दी अजय बापूसो पाटील यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगली रस्त्यावर आसरानगर बसस्टॉपसमोर अजित पाटील कुटुंबासह राहतात. त्यांच्या वडिलांना बुधवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबिय गेले होते. गुरूवार सकाळी ते घरी परतले असता चोरीची घटना निदर्शनास आली. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे
कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
आतील लाकडी कपाटे किल्लीने उघडून आतील साहित्य विस्कटले. ड्रॉव्हर तसेच कपाटात ठेवलेले ऐवज लांबवले. याबाबतची माहिती समजताच गावभागचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मुख्य रस्त्या लगतच पाटील यांचे घर असल्याने माहितीगाराने ही कृत्य केले असावे असा पोलिसांचा संशय आहे.