इस्लामपूरात वाहनधारकांची तारेवरची कसरत!

इस्लामपूर-पेठ रस्ता एकेरी आहे. त्यातच खड्डेही भरपूर आहेत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. वाहनधारकांची संख्या पाहता लक्ष्मी नारायण रुग्णालयासमोरील खड्डयामध्ये पडून अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरतच करावी लागते. इस्लामपूर ते लक्ष्मी नारायण रुग्णालयापर्यंत दोन वाहने जाणारा रस्ता तयार झाला आहे, परंतु पुढे पेठपर्यंत हा रस्ता एकेरी असल्याने अपघाताला निमंत्रण झाला आहे.

सांगली-पेठ रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारत इस्लामपूर ते लक्ष्मी नारायण रुग्णालयापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. परंतु तेथून पुढे एकेरी रस्ता सुरू होतो. याच ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. बहुतांशी दुचाकीस्वार वेगाने येऊन या खड्डयात पडून जखमी झाले आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.