मंगळवेढा तालुक्यात महसुल विभागाला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवेढा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap) मोठी कारवाई केली आहे.यात प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश सगर यांच्यासह विवेक ढेरे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे.तक्रारदार यांचे टाटा मेगा वाहन सन २०२० मध्ये वाळू वाहतुक करताना तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून पकडण्यात आले असून, सदरचे वाहन जप्त करुन तहसिलदार सांगोला यांनी तक्रारदार यांचे वाहनावर १ लाख ३७ हजार ६८४ रुपये शासकीय दंड आकारला होता.
सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चलनाव्दारे भरुन त्याची पावती तहसिल कार्यालय सांगोला येथे जमा केली.वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्याकरीतां उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वाहन सोडणेबाबतचा अर्ज सादर केला असून
सदर अर्जावरुन तक्रादार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देणेकरीता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथील १) प्रकाश सगर, नायब तहसलिदार २) विवेक ढेरे, पद महसुल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरीता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचेकरीता म्हणून २० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंति १० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून त्यापैकी ५ हजार रुपये लाच रक्कम विवेक ढेरे यांनी स्वतः स्विकारले वरुन त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे रंगेहात पकडण्यात येवून त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.