महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला. पण, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही.सोलापूर शहराजवळील हद्दवाढ भाग १९९२ रोजी महापालिकेत समाविष्ट झाला, पण अजूनही तेथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही.
आता समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटीतून सुरू आहे, पण काम पूर्ण झाल्यानंतरही शहरांतर्गत जलवाहिनी व्यवस्था सुधारावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून लोकसभेवेळी शहरातील पाणी, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर असे मुद्दे प्रचारात आणले जातील. त्यामुळे सत्ताधारी आमदारांकडून शहराच्या पाणीपुरवठ्यावर दररोज लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे.
सध्या चार दिवसाआड पाणी असून साधारणत: १० मेपासून त्यात एक दिवसाची वाढ होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने या काळात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
उजनीतील पाणीसाठा सध्या उणे १७ टक्के असून सोलापूर शहराला १० मार्चपासून भीमा नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनीतील साठा उणे ३२ टक्के होईल. मार्चअखेर महापालिकेला दुबार पंपिंग करावे लागणार असून पाणी कमी झाल्याने मेमध्ये सोलापूरचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड होवू शकतो. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले जात आहे.