लातूरमधील नीट पेपरफुटीप्रकरणी निलंबित शिक्षक संजय जाधव याच्या प्रकरणानंतर प्राथमिक शिक्षण विभाग ॲलर्ट झाला असून शिक्षकांसाठी नियमावली बनविली आहे. गणवेशाच्या बंधनासह मोबाईल वापरावर निर्बंधाचा त्यात समावेश आहे.
त्याबाबत लवकरच शिक्षकांना लेखी व बैठका घेऊन तोंडी सूचना देण्यात येणार आहेत. त्याचा भंग केल्यास शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नीटप्रकरणी टाकळी टें (ता. माढा) येथील शिक्षक संजय जाधव याला एटीएसने अटक केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, तो लातूरमध्ये क्लास चालवायचा. त्यासाठी सहजपणे ये – जा करता यावे, यासाठी त्याने आंतरजिल्हा बदलीत टाकळी येथील शाळा निवडली. तसेच पत्नी मनोरुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राद्वारे संवर्ग एकमधून अक्कलकोट तालुक्यात बदली मिळविली.पत्नी मनोरुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राची प्राधिकृत यंत्रणेकडून खातरजमा केली जाणार आहे. तर चौकशीत तो दीर्घ रजेवर गेला नसल्याची व पोटशिक्षक नेमला नसल्याचे आढळले असले तरी त्याच्याकडून लातूरमध्ये चालवले जाणारे क्लास, नीट पेपर फुटीतील त्याचा सहभाग आणि १२ जूनपासून बेकायदा शाळेवरील त्याची गैरहजेरी याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी नियमावली तयार केली आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी पूर्ववेळ हजर राहणे, खासगी क्लास न चालविणे हे बंधनकारक असले तरी त्यात काही नव्या नियमांचा समावेश केला आहे. त्याबाबत शिक्षकांना लेखी व बैठका घेऊन तोंडी सूचना देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.
शिक्षकांसाठी अशी राहील नियमावली
निर्धारित वेळेत पूर्णवेळ शाळेत रहावे
शिक्षकांसाठी गणवेश निश्चित करणार
शाळेच्या वेळेत त्या गणवेशातच असावे
शाळेच्या वेळेत मोबाईलचा वापर करता येणार नाही
खासगी शिकवणी वर्ग चालवता येणार नाही
शिक्षक संजय जाधव याचा नीट पेपर फुटीतील सहभाग आणि बेकायदा गैरहजर राहण्याची बाब गंभीर आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिक्षकांकडून असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यांना गणवेश बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यांनी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ गणवेशात हजर असावे. मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालण्यात येईल. त्यांना खासगी शिकवणी वर्ग चालवता येणार नाही. असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.