सोलापुरात दुभत्या जनावरांचे दर घटले…

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने जनावरे जगवण्याचे संकट दूध उत्पादकांवर ओढावले आहे. चारा, पाणी टंचाईचा परिणाम बाजारातील जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे.दुभत्या जनावरांचे दर वीस ते तीस हजारांनी खाली आले आहेत. शिवाय बाजारात दर मिळत नसल्याने खरेदी-विक्रीही कमी झाली असून गाई-म्हशी, बैलांच्या नावाजलेल्या बाजारातही आवकेत मोठी घट झाली आहे. राज्यभरातील ही स्थिती चिंताजनक आहे.

राज्यात नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुधाला पुरेसा दर नसल्याने सातत्याने पशुपालन अडचणीत आहे. संकटावर मात करत पशुपालन करणारे शेतकरी यंदा दुष्काळ, पाणी, चारा टंचाई, दुधाचे पडलेले दर आणि पशुखाद्याचे वाढते दर यामुळे अडचणीत आहेत.यंदा दुष्काळी स्थितीमुळे तसेच दूध व्यवसाय परवडणारा नसल्याने दुभती जनावरे विकण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. मात्र बाजारात खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने दुभत्या जनावरांच्या दरात वीस ते तीस हजारांनी (२० ते २५ टक्के) घट झाली आहे. दुभत्या गाई, म्हशींसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा), लोणी (ता. राहाता) यासह अन्य गाई-म्हशीच्या बाजारात खरेदी-विक्रीवर परिणाम दिसत आहेत.