प्रेमापेक्षा मैत्रीचे नाते सर्वश्रेष्ठ – म्हैसाळकर महाराज

या जगात हजारो जीव जन्मास येतात. त्या असंख्य जीवामध्ये मनुष्य प्राण्याचा जन्म मिळणे भाग्यात असावे लागते. नुसता मनुष्य जन्म मिळून देखील चालत नाही. कारण मनुष्य जन्म मिळूनही सर्वांचे वाढदिवस साजरे होत नाहीत. जो व्यक्ती पटोपकरी आहे, समाजासाठी योगदान देतो, अशा व्यक्तींचेच वाढदिवस साजरे केले जातात. सांगोल्यात नेहरू चौकातील लिंगायत मठातील विरूपाक्ष उर्फ तम्मा स्वामी यांनी आपले सुपुत्र गुरुराज याना मठाचे उत्तराधिकारी म्हणून समाज सेवेसाठी दिल्याने अशा दातृत्व असणाऱ्या व्यक्तींचे वाढदिवस समाजाकडून व मित्रमंडळी कडून साजरे केले जातात.

असे विचार म्हैसाळकर स्वामी महाराज यांनी व्यक्त केले. विरूपाक्ष स्वामी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात आशीर्वाद देताना म्हैसाळकर स्वामी बोलत होते. एस.एस.सी. ७५ अकरावी जुनी शेवटची बॅच चे वतीने विरूपाक्ष स्वामी यांचा वाढदिवस नेहरू चौकातील लिंगायत मठात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे म्हैसाळकर स्वामी महाराज यांची भेट अनौपचारिक होती.

त्यांच्या भेटीमुळे व दर्शनामुळे कुटुंबीय व मित्रमंडळी भक्तिभावात न्हाऊन गेले. या प्रसंगी बॅचचे वतीने विरूपाक्ष यांचा म्हैसाळकर स्वामी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे आशीर्वाद देताना महाराज म्हणाले की मैत्रीचे नाते हे प्रेमाच्या नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगताना त्यांनी राधा कृष्ण यांची गोष्ट सांगून मैत्रीच्या नात्याने श्रेष्ठत्व अधोरेखित केले. ज्येष्ठ नागरिकांनी प्रभात भ्रमण, हास्य, योग यांना अधिक महत्व देऊन मित्रमंडळीत जास्तीत जास्त काळ व्यतीत करावा, असे शेवटी त्यांनी सांगितले.

प्रारंभी विलास नलवडे गुरुजी यांनी कार्यक्रमाचा हेतू व मित्रमंडळ घेत असलेल्या कार्यक्रमांची माहिती म्हैसाळकर स्वामींना करून दिली. या प्रसंगी प्रा. राजेंद्र ठोंबरे, विश्वनाथ उर्फ खंडू कुलकर्णी, बाळासाहेब ताकभाते, हेमंत तेली, साईराम उर्फ आनंदराज कांबळे, सतीश बिडीकर यांनी मनोगत व्यक्त करून विरूपाक्ष यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी अशोक जाधव, चंद्रकांत जाधव, यांच्यासह अनेक मित्र सदस्य, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.