सांगोला तालुक्यातील महूदमध्ये ७४ हजार रुपयांची तांब्याची तार चोरीस

अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिकल दुकानाच्या पत्रा शेडचे शटर उचकटून दुकानातील ७४ हजार रुपये किमतीची ३६० किलो तांब्याची वायर चोरून नेल्याची घटना सांगोला तालुक्यातील महूद येथे घडली. या प्रकरणी स्वप्नील विकास देशमुख यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महूद येथील स्वप्नील विकास देशमुख यांचे सांगोला ते महूद रोडवरील अकलूज चौकात मोटार सामान दुरुस्तीचे व विक्रीचे पत्रा शेडचे समर्थ इलेक्ट्रिकल नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी (ता. ८) रात्री आठ वाजता देशमुख हे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ते दुकानाकडे आले असता त्यांना दुकानाच्या पत्रा शेडचे शटर उचकटून पत्रा कापलेला दिसला.

त्यावेळी त्यांनी घरातील सदस्य तसेच मित्र, नातेवाइकांना बोलावून घेतले. त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता दुकानातील पाण्याच्या मोटारची तांब्याची नवीन व जुनी वायर चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून ५० हजार रुपये किमतीची पाण्याच्या मोटारची तांब्याची २०० किलो नवीन वायर, २४ हजार रुपये किमतीची पाण्याच्या मोटारची तांब्याची १६० किलो जुनी वायर अशी ७४ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरल्याची खात्री स्वप्नील देशमुख यांना झाली. याप्रकरणी त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.