दिपावली सणासाठी स्वस्तात किराणा माल न मिळाल्याने खरेदी न करता परत सांगोल्याकडे येत असताना सोनंदजवळ क्रेटा गाडीतून आलेल्या पुण्यातील चौघांनी किराणा व्यापाऱ्यास खलास करण्याची धमकी देत पिकअप, अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, दोन मोबाईल असा ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, ग्रामस्थांनी चोरी करून जाणाऱ्या एकास पिकअपसह महुद येथे पकडले. याप्रकरणी दिलीप रामचंद्र मस्के रा. मस्के कॉलनी, सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण नवनाथ गोरे रा. वाघोली पुणे, सुधीर तुपे, . रणजित कांबळे आणि विशाल (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. हिंजवडी पुणे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिलीप रामचंद्र मस्के, नवाज बादशहा मुलाणी, विलास दशरथ राऊत असे मिळून एम. एच. ४५. ए. एफ. १९०९ ही पिकअप भाडयाने करुन दिपावली सणासाठी किराणा माल खरेदीसाठी अथणी कर्नाटक येथे गेले होते. सदर ठिकाणी स्वस्तात किराणा माल मिळाला नसल्याने माल: खरेदी न करता सांगोला येथे परत येत होते. रात्रीच्या सुमारास सोनंदजवळ पाठीमागुन एम. एच. १४ जे. आर. ७७२९ ही क्रेटा गाडी वेगाने आली आणि पिकअपला आडवी लावली. क्रेटा गाडीतून चौघेजण खाली उतरून त्यांनी पिकअपची चावी काढून घेतली.
चालक नवाज बास खाली ओढुन शिवीगाळी धक्काबुक्की करून मोबाईल काढून घेतला. तर दोघांनी दिलीप मस्के वास बाहेर ओढून शिवीगाळी, जीवे मारण्याची धमकी देत बोटातील सोन्याची अर्धा तोळ्याची अंगठी काढून घेतली. तसेच विलास राऊत वास धक्काबुकी, दमदाटी करून त्याचा मोबाइल काढून घेतला. तक्रार दिली तर खलास करून टाकीन अशी धमकी देत पिकअप घेवून गेले. त्यानंतर मस्के यांनी महुद येथील नातेवाईक महेश ढोणे याना घडल्या प्रकाराची माहिती देवून पिकअप आणि क्रेटा गाडी पकडण्यास सांगीतले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ग्रामस्थांनी पिकअप गाडी महुद येथे धरून चालक किरण नवनाथ गोरे रा. वाघोली पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पळून गेलेल्या इसमांची नावे सुधीर तुपे, रणजित कांबळे आणि विशाल (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. हिंजवडी पुणे असे असल्याची माहिती दिल्ली. या घटनेत वरील चौघांनी २५ हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची अंगठी, ४ लाख रुपये किमतीचा पिकअप, ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद दिलीप रामचंद्र मस्के यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे.
