प्रसिद्ध पर्यटनस्थळी काचेचा पूल तुटला, पर्यटक ३० फुटांवरुन खाली कोसळला अन्..

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. यातील काही नैसर्गिक स्थळे आहेत. तर, अनेक पर्यटन स्थळं ही मानवाने निर्माण केलेली आहेत. यापैकीच एक म्हणजे इंडोनेशियातील प्रसिद्ध काचेचा पूल. एका मोठ्या हाताच्या आधारावर बांधलेला हा पूल काचेचा आहे. दरवर्षी अनेक पर्यटक हा काचेचा पूल ओलांडण्याचा थरार अनुभवायला जातात. मात्र, या पुलावर नुकताच एक अपघात झाला असून त्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यात ३० फूट खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. अपघाताच्या वेळी या पुलावर अनेक लोक उभे होते. तेवढ्यात या पुलाच्या काचा फुटल्या. या घटनेत एका पर्यटकाचा खाली पडून जागीच मृत्यू झाला. तर पूल कोसळल्याने अनेक पर्यटकांना धक्का बसला. पुलाच्या काचेत एक व्यक्ती अडकला, त्याला इतर लोकांनी मिळून बाहेर काढले त्यामुळे त्याचा जीव वाचला.

पोलिसांकडून तपास सुरू

या अपघातानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या अपघातापूर्वीही अनेकांनी पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या पुलावरून आलेल्या अनेक पर्यटकांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, त्यांच्या मते हा पूल सुरक्षित नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा बैठका घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, पुलाच्या व्यवस्थापकाने नेहमी त्याला नकार दिला. आता या अपघातानंतर सर्वजण चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.