सदाभाऊ खोत यांची विधानपरिषद आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर!


वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्राच्या उस पट्ट्यात शेतकरी चळवळीत एकेकाळी सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखले जाणारे खोत दुसर्यांचा विधीमंडळाच्या सभागृहाचे सदस्य होण्याची संधी आली असताना या जोडीतील राजू शेट्टी यांचा मात्र लोकसभा निवडणुकीत दुसर्यांदा पराभव झाला. २ मार्च १९८६ साली चळवळीच्या माध्यमातून सदाभाऊ खोत एक मुलूखमैदान तोफ म्हणून पुढे आले. १० जून २०१६ रोजी विधानपरिषदेवर त्यांची आमदार म्हणून निवड झाली होती.

८ जुलै २०१६ रोजी ते कृषी, पणन, पाणी पुरवठा, फलोत्पादन या विभागाचे राज्यमंत्री झाले होते. मंत्रीपद गेले, आमदारकी गेली पण, ते घरात स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी जवळपास २०० पेक्षा अधिक मोर्ची आणि आंदोलने केली. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे जे निर्णय होतील त्याच्यासोबत ते ठाम उभे राहिले. लोकसभा निवडणुकीत त्यांना हातकणंगलेतून संधी होती. मात्र, ते थांबले.

विधानपरिषदेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपकडे राजकीय पूनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून त्यांना विधानपरिषदेच्या आमदारकीचे तिकिट मिळाले. पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिपणी करण्यासाठी त्यांच्या ग्रामीण ढंगातील वक्तत्वाचा लाभ घेता येईल या हेतूनेच भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली असावी. आता भाजपचे पुढचे लक्ष्य इस्लामपूर मतदार संघ असणार आहे. या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठीची ही रणनीती तर नाही ना अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते आहे.