सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी पक्ष सोडून अन्यत्र जाणार, या अफवा आहेत. पण मी कोठेही जाणार नाही. शरद पवार साहेबांसोबतच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष मजबुतीसाठी जोमाने आणि कोणतीही शंका मनात न ठेवता काम करावे. मी कोठेही जाणार नाही. पवारसाहेबांच्या शब्दाबाहेर मी नाही. कार्यकर्त्यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागावे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम किंवा अन्य कारणाबाबत पक्षातर्फे आंदोलने केली जातील. या माध्यमातून लोकांपर्यंत संपर्क वाढवा, असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशाची कारणे मांडली. तसेच ईव्हीएम, लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे प्रचार व जातीयवादी प्रचारचा महायुतीला फायदा झाल्याचे कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडले. बैठकीला शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, अभिजित हारगे, राहुल पवार, मैनूद्दीन बागवान, युवराज गायकवाड, पवित्रा केरीपाळे, मिरजेतील पराभूत उमदेवार तानाजी सातपुते आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेत ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या कार्यालयात घेतली. यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचा संदेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.