इचलकरंजीत कचरा ठेकेदारची आयुक्तांकडून झाडाझडती….

इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कचरा उठावाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून ठेकेदार आदर्श कंपनीची झाडाझडती घेतली. यावेळी घंटागाडीसह कचरा उठाव करणारी इतर वहाने पार्किंगवरच आढळून आल्याने मक्तेदाराची चांगलीच कानउघडणी केली. आदर्श कंपनीबाबत वारंवार तक्रारी वाढत असल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी घंटागाडी पार्किंगच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सकाळी ८ वाजेपर्यंत घंटागाड्या डिझेल भरणेसाठी थांबलेल्या निदर्शनास आल्या.

तसेच पार्किंगवर नादुरुस्त गाड्या लवकर दुरुस्त होत नाहीत, कॉम्पॅक्टरसह इतर वाहने कचरा उठावासाठी योग्यरित्या वापरल्या जात नाहीत, रजिस्टरमध्ये योग्यरित्या नोंदी होत नाहीत, या बाबी निदर्शनास आल्या. यावेळी संबधीत कंपनीच्या व्यवस्थापकांची कान उघाडणी केली. योग्य वापर होत नसल्याने शहरातील कचरा उठाव पूर्ण क्षमतेने होत नाही. यामध्ये तात्काळ सुधारणा करावी अन्यथा कारवाई करण्याच्या सूचना संबंधित मक्तेदारास दिल्या

याचबरोबर एमएसईबी, खाऊ गल्ली येथील खाद्य पदार्थ विक्रेते सांडपाणी रस्त्यावर सोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या ठिकाणीच्या सर्व विक्रेत्यांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करणेच्या सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर, सोमनाथ आढाव, स्मृती पाटील यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षकांसमवेत गांधी चौक ते शिवतीर्थ मुख्य रस्त्यावर फिरती करून शहरातील स्वच्छतेची पाहणीही आयुक्त दिवटे यांनी केली.