शेताकडे वैरण आणण्यासाठी जात असताना एक्का बैलगाडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत राजवर्धन प्रशांत लवटे (रा. गुरुकन्नननगर मठामागे कोकरे मळा) या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास जुना चंदूर रोड परिसरात घडली. याबाबतची वर्दी किरण महादेव हुबळी (२६, रा. कोकरे मळा) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे. घरातून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच राजवर्धन याच्या मृत्यूची घटना कळताच त्याच्या आईसह कुटुंबीयांना धक्का बसला. कोकरे मळा परिसरात राहणारे प्रशांत लवटे यांचा राजवर्धन हा मुलगा. त्याचे मामा आनंदा कोकरे यांची जुना चंदूर रोड परिसरात शेती आहे. राजवर्धन वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन निघाला होता.
जुना चंदूर रोडवरील लायकर दडाजवळील बाराबिगी शेतवाडीतून जात असताना एका वळणावर दगडावरुन बैलगाडी उलटली. गाडी उलटल्याने राजवर्धनही गाडीतून उडून खाली पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन आणि त्याच्या तोंडातून व कानातून रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच नातेवाईक व भागातील नागरिकांनी घटनास्थळी तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. राजवर्धन हा व्यंकटराव हायस्कूल येथे आठवीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.