नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची अशी बातमी आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एससीने मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एसएससी एकूण 8326 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. एसएससीने जारी केलेल्या अधिसूचनेत एकूण पदे, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेची तारीख अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
परीक्षा कधी, तारीख
स्टाफ सिलेक्शन कमिशनने या पदभरतीसंदर्भात नुकतेच आपल्या ssc.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करता येईल. SSC MTS परीक्षा 2024 सालातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. लवकरच या परीक्षेची नेमकी तारीख जाहीर केली जाणार आहे.
निवड कशी होणार?
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे दरवर्षी मल्टि टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी परीक्षांचे आयोजन केले जाते. यशस्वी परीक्षार्थींना नंतर सरकारच्या वेगवेगळ्या विभागांत नियुक्ती दिली जाते. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे तसेच शारीरिक चाचणीतील (हवालदार पदासाठी) गुणांच्या आधारे तसेच कागदपत्रांची छाणणी करून उमेदवाराची निवड केली जाईल.
शैक्षणिक पात्रता, वयाची अट
एसएससीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कमीत कमी इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचे वय हे 18 ते 25 आणि 18 ते 27 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे. ही एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे.