सध्या आषाढी वारीनिमित्त गावागावाहून पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. जागोजागी मुक्काम करत पंढरपूर मध्ये पोहोचतात. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांनी विविध गावातून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. यातील पाच पायी दिंडीतील वारकऱ्यांचा पालखी मुक्काम खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरूदेव देवस्थानाच्या ठिकाणी करण्यात आला आहे. रविवारी सात जुलैला दिंड्या दाखल झाल्या.
१२ जुलैपर्यंत पाच पायी दिंड्यांचा मुक्काम असून या कालावधीत सलग पाच दिवस तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मांसाहारी यात्रा व बकऱ्यांचे बळी देण्यास बंदी घातल्याची माहिती देवस्थान परिसर विकासाचे व्यवस्थापक सामाजिक कार्यकर्ते विलास मुळीक यांनी दिली. ७ जुलै रोजी किल्लेमच्छिंद्रगड ते पंढरपूरकडे जाणारी मच्छिंद्रनाथ पालखी रेवणगाव येथे मुक्कामी येत आहे.
९ जुलै रोजी मोहित्यांचे वडगावहून निघालेली प. पू. सद्गुरू हणमंत महाराज रामदासी दिंडी पालखी तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरूदेव येथील भक्त निवासात मुक्कामी येणार आहे. १० जुलै रोजी श्री वेताळगुरूदेव तीर्थक्षेत्राच्या भक्त निवासात कोल्हापूरच्या गगनवाबडा येथील श्री रेवणसिद्ध पालखी पायी दिंडी मुक्कामी येत आहे. ११ जुलैला दुपारी रेठरेहरणाक्ष येथील सद्गुरू जंगली महाराज दिंडीतील वारकरी भोजनासाठी येथे येत असून रात्री वाळवा तालुक्यातील नेलें येथील जनाक्का दिंडी पालखी श्री वेताळगुरूदेव देवस्थानावर मुक्कामाला येत आहे.