सुहास भैयांना अनिल भाऊंपेक्षा दुपटीने मताधिक्य देण्याचे शंभूराज देसाई यांचे आवाहन

खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांचा उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आला.ना. शंभूराज देसाई विटा येथे आले होते. यावेळी बाबर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर हे माझ्या वडिलांचे अत्यंत जवळचे स्नेही होते. मी आमदार म्हणून काम करत असताना आणि भाऊंनी कायम माझ्यासाठी मार्गदर्शनाची भूमिका पार पाडली. वास्तविक आज ते नसताना त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज भरायला आलो असताना आपण सर्वजण भावनिक झालो आहोत. परंतु सुहास भैयांना अनिलभाऊ पेक्षा दुप्पट मताधिक्यांनी निवडून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि तीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली असेल असे भावनिक आव्हान राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

यावेळी सुहास बाबर म्हणाले वास्तविक आजचा प्रसंग माझ्यावर येईल असे कधी वाटले नव्हते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने एखादा डोंगर कोसळला पण अनिल भाऊंच्या फोटोच्या साक्षीने मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की अनिलभाऊ ज्या पद्धतीने समर्पित जीवन जगले त्या पद्धतीने मतदारसंघातील प्रत्येक घटकासाठी मी अखेरपर्यंत कार्यरत राहीन.