इचलकरंजी विधानसभेची जागा गेली अनेक वर्षे काँग्रेस लढवत आहे. महायुती झाल्यामुळे ही जागा काँग्रेसकडे पूर्ववत राहणार की राष्ट्रवादी अथवा शिवसेनेकडे जाणार, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रवादीमधून मदन कारंडे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, तर काँग्रेसमधून शहर अध्यक्ष संजय कांबळे, प्रदेश सचिव शशांक बावचकर, माजी नगरसेवक राहुल खंजिरे हेही निवडणूक लढवू इच्छितात. दोन दिवसांपूर्वी कांबळे यांनी मुंबईत जाऊन जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची भेट घेतली. इचलकरंजीची जागा काँग्रेसकडे ठेवावी, असा आग्रह त्यांनी धरला. सर्वजण एकदिलाने काम करून ही जागा निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी जिल्हाध्यक्षांना दिला.
इचलकरंजी विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला ठेवण्यासाठी येथील नेते आग्रही आहेत.प्रदेश काँग्रेसच्या मागणीनुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठविण्यास सुरुवात केली आहे. शहरात तीनहून अधिक उमेदवारी मागणीचे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे जाणार आहेत.प्रदेश काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून १० ऑगस्टपर्यंत अर्ज मागवले आहेत. त्यानुसार शहरातील काँग्रेसमधील इच्छुकांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अंतिम निर्णय जरी प्रदेश कार्यालय घेणार असले, तरी जिल्हाध्यक्षांच्या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हाध्यक्ष कोणाची शिफारस करतात, त्यावरच येथील उमेदवारी अवलंबून असणार आहे.