घोरपडे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा सात कोटींचा प्रस्ताव शासनाकडे, आचारसंहितेपूर्वी मंजुरी शक्य

इचलकरंजी येथील कला व सांस्कृतिक याचा वारसा जपणाऱ्या महापालिकेच्या मालकीच्या श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहाचे नूतनीकरण होणार आहे. याबाबतचा ७ कोटी ४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला आहे. तो मंजुरीच्या प्रतीक्षेत असून महापालिका प्रशासनाकडून त्याबाबतचा शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाट्यगृहातील असणाऱ्या बहुतांश असुविधा दूर होणार असून पूर्ववैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

घोरपडे नाट्यगृहाच्या साउंड सिस्टीमपासून ते वातानुकूलीत यंत्रणेपर्यंत सर्वच यंत्रणा कालबाह्य झाल्या आहेत. आयोजकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिका फंडातून गरजेप्रमाणे जुजबी दुरुस्ती केली जाते. पण परिपूर्ण नाट्यगृह नसल्यामुळे नूतनीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महापालिका बांधकाम विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.

शासनाकडे हा प्रस्ताव सद्या प्रलंबित असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. ७ कोटी ४ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नाट्यगृहाचा पूर्वीसारखा रुबाब पुन्हा पहावयास व अनुभवयास मिळणार आहे. यामध्ये अनेक चांगल्या सुविधा देता येणार आहेत.