वस्त्रनगरीत कधी टीका तर कधी पाठराखण!

वस्त्रोद्योगनगरी कामगारांचा बालेकिल्ला. निवडणुकीबाबत कामगारांत प्रचंड उत्सुकता आहे. रोज एखादी प्रचाराची फेरी निघते. त्यानंतर त्याच उमेदवारांच्या प्रचाराचा धागा घेऊन गटागटाने चर्चा करीत बसलेले ज्येष्ठ नागरिक, कामगार, वाहतूकदार दिसतात.

चर्चेचा सूरही स्थानिक उमेदवारापासून दिल्लीतील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या भूमिकेवर कधी टीका, तर कधी पाठराखण असा आहे. साहजिकच येथे संमिश्र असे चित्र आहे. प्रचाराला अद्याप गती नसल्याचे चित्र आहे. गप्पांतून सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही गटांच्या बाजूने चर्चा रंगत आहेत. त्यातून तयार होणाऱ्या जनमतातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल, असे दिसते.