बोरगाव कृष्णा काठावरील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बालेकिल्ल्यात अनेक पक्षांची जयंत पाटील निशिकांत पाटील गटबांधणी, कार्यकर्ते मजबूत व सक्षम बनवण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्वच पक्षांची कामगिरी पाहता राष्ट्रवादी व विरोधक समान पातळीवर पोहोचल्याचे संकेत पहायला मिळत आहेत.कृष्णा काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, बहे, ताकारी, वाळवा ही मोठी गावे व याखालील सर्व वाड्या व छोटी गावे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. त्याच बालेकिल्ल्यात विरोधकांनी यशस्वी घुसखोरी केल्याचे पहायला मिळत आहे. पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचा दांडगा दबदबा होता. मात्र, आज परिस्थिती बदललेली आहे. सध्या कृष्णा काठावर काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसेचे शेतकरी संघटना यांचे कार्यकर्ते पदाधिकारी तयार झाले आहेत.
विरोधक नेत्यांचे गावा-गावात बॅनर व फलक झळकत असून, अनेक पक्षांचे झेंडेही फडकताना दिसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वच पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. वाळवा मतदारसंघात अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. या इच्छुकांनी व्यक्तिगत भेटीगाठीवर भर दिला आहे. तसेच नेत्यांची तयारी सुरु कृष्णा काठावरील बदल्या राजकीय परिस्थितीला कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील हे नेते व कार्यकर्ते यांच्या सतत संपर्कात आहेत. आपआपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी धैर्यशील माने, निशिकांत पाटील, राजू शेट्टी, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, आनंदराव पवार, वैभव पवार या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे.
सभा समारंभ, लग्न, वाढदिवसला भेटी व बॅनरबाजीवर अधिक भर देत आहेत. विरोधकही यासाठी कार्यकर्त्यांना तगडी आर्थिक कुमक व सर्व ताकद देत आहेत. याला काँग्रेस (शरदचंद्र पवार) काँग्रेस कशी रोखते व कार्यकर्त्यांची मजबूत फळी एकसंघ ठेवते हे येणाऱ्या काळात पहायला मिळेल. याच घडामोडीवर कृष्णा काठावर भविष्यातील राजकीय स्थित्यंतरे अवलंबून आहेत. कृष्णा काठावरील बदलती राजकीय परिस्थिती कशी बदलते हे येणारा काळच ठरवणार असून, त्यासाठी विधानसभा निवडणुकीची वाट पहावी लागेल.