इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच!

सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक प्रक्षाकडून जोमाने काम सुरु आहे. मात्र कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतीत मात्र अजून तर्कवितर्क सुरु आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये इचलकरंजी विधानसभेची जागा परंपरागत काँग्रेसकडेच राहावी, यासाठी कॉँग्रेसच्या वतीने शशांक बावचकर, राहुल खंजिरे आणि संजय कांबळे यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे. पक्षाने उमेदवारीसाठी सर्वसामान्य वर्गासाठी वीस हजार रुपये आणि मागासवर्गीय व महिला उमेदवारांसाठी दहा हजार रुपये भरून नाव नोंदणीचे आवाहन काँग्रेसने केले आहे. त्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. त्यानुसार बावचकर, कांबळे आणि गतवेळचे उमेदवार खंजिरे हे तिघे नोंदणी करणार आहेत.

त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, आपणच महाविकास आघाडीचा उमेदवार होणार, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली जात आहे. आरोग्य शिबिर, मतदार नोंदणी कार्यक्रम या माध्यमांतून त्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.स्थानिक पातळीवरील आघाडीत घटक पक्ष असलेल्या मॅँचेस्टर आघाडीकडून डबल मोक्का कारवाईतून जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा हद्दपार केलेले संजय तेलनाडे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. या सर्व गोतावळ्यातून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

उमेदवारी कोणालाही मिळाली तरी या रस्सीखेचमधून बाहेर पडणारे उमेदवार नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून तीन, राष्ट्रवादी एक व मँचेस्टर आघाडीकडून एक असे इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावत आहेत. यातून कोण बाजी मारणार आणि त्यातून कोणाची नाराजी ओढावणार, याकडे लक्ष लागले आहे.