सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग, कॅशलेस मेडिकल सुविधा या मागणीसह प्रलंबित मागण्यासाठी आषाढी एकादशी दिवशी राज्य सरकारला जाग यावी, यासाठी एकदिवसीय संप करण्यात येणार आहे. यामुळे आषाढी वारी दिवशी एसटीची वारी थांबणार का? याकडे लक्ष लागले आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने राज्य शासन व एसटी प्रशासनास दिले. निवेदनात म्हटले आहे, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दुय्यम वागणूक दिली असून, सन २०२१ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक होऊन संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या १६ मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.
२० डिसेंबर २०२२ पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी एका महिन्यात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रश्न निकाली निघालेच नाहीत. नुकतीच राज्यातील वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाकडे मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे ,आषाढी एकादशीच्या दिवशी संपाचा इशारा देणार आहेत.