इचलकरंजीसाठी अमृत २.0 अंतर्गत राज्य शासनाने मंजुर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करावा. त्याचबरोबर राज्यशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांना जाग यावी यासाठी श्रावण सोमवारनिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने कावड यात्रा काढून गावभागातील महादेव मंदिरात शंभू महादेवाला अभिषेक घालून अनोखे आंदोलन केले.
राजवाडा चौकातून महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या कावड यात्रेत महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. इचलकरंजी शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुळकुड योजना मंजुर केली. मात्र ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी विलंब होत आहे. याला लोकप्रतिनिधींची अनास्था आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे शहरवासियांना दैनंदिन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तिसऱ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधत अनोखे आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि शासनाला सुबुध्दी द्यावी आणि इचलकरंजीवासीयांचा पाणी प्रश्न लवकर सुटावा अशी प्रार्थना यावेळी मंदिरात करण्यात आली.
राजवाडा चौकातून निघालेल्या कावड यात्रेत मदन कारंडे, सागर चाळके, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, संतोष शेळके, बाबासाहेब कोतवाल, अमर जाधव, वसंत कोरवी यांच्यासह घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
