दिघंचीत कार-दुचाकीची धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.असाच एक अपघात आटपाडी तालुक्यात झालेला आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील दिघंची-मायणी रस्त्यावर दिघंची गर्ल्स हायस्कूलनजीक कार- मोटारसायकलची जोरदार धडक झाली. धडकेत मोटारसायकलवरील भारत शिवाजी विभुते (वय 52, रा. बोंबेवाडी, ता.आटपाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर बबन शिवाजी कंडरे (55, रा. माडगुळे, ता. आटपाडी) हे जखमी झाले. बुधवारी (दि. 25) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एक कार (एमएच 11 एडब्ल्यू 1211) दिघंची बसस्थानकाकडे येत होती. त्याचवेळी दिघंची गर्ल्स हायस्कूलजवळ गावातून येणार्‍या रस्त्यावरून आलेल्या मोटरसायकलस्वाराची (एमएच 04 सीएस 262) व या कारची दिघंची स्कूलनजीकच्या चौकात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेत मोटरसायकलवरील भारत विभुते यांचा जागीच मृत्यू झाला, तर बबन कंडरे जखमी झाले.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ग्रामस्थांनी जखमी कंडरे यांना तातडीने उपचारासाठी आटपाडीला हलवले. याबाबत बबन भगवान कंडरे (रा. माडगुळे, सध्या रा. बोंबेवाडी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधव तपास करीत आहेत.