हिप्परगरी व अलमट्टी धरणातील पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्यास कोल्हापूर, सांगली महापुराचा फटका

गेल्या आठवड्यात हिप्परगी व अलमट्टी धरणातील (Hippargi and Almatti Dam) ५२१.६० मीटर पाणी पातळी होती.त्यामुळे कोल्हापूरची पंचगंगा (Panchganga River) व सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची फूग वाढली होती.

याबाबत कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हिप्परगी येथे जाऊन जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला त्यानंतर हिप्परगीचा विसर्ग वाढवल्यानंतर ७२ तासांनी म्हणजे बुधवारी कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी दीड फुटाने कमी झाली. केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीप्रमाणे विसर्ग ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा कृष्णा महापूर नियंत्रण समिती व धरण अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केली.

हिप्परगरी व अलमट्टी धरणातील पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्यास कोल्हापूर, सांगली महापुराचा फटका बसतो. यंदाही ९ जुलैला हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद असल्याने पाण्याची फूग कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यापर्यंत वाढली होती. कृष्‍णा महापूर नियंत्रण समितीच्या कार्यकर्त्यांनी हिप्परगी येथे जाऊन अभियंत्याशी चर्चा केली. कोल्हापूर- सांगलीतील पाण्याची फूग वाढल्याचे दाखवून दिल्यानंतर विसर्ग वाढवला. त्यानंतर जमखंडी, अथणी ते राजापूर येथील पाणी पुढे सरकू लागले तसे कोल्हापुरातील पाण्याची फूग ७२ तासांनी राजाराम बंधारा तसेच राजापूर, नृसिंहवाडी येथील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली.