हसन मुश्रीफ यांना धक्का, अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट अनुभवणारे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ए वाय पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेऊन निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलताना ए वाय पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि के पी पाटील यांच्यातून बाहेर पडलो ते बरं झालं अन्यथा या दोघांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला असता असा हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर ए. वाय. पाटील यांनी नागपूरमध्ये गेल्यानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेच्या निमित्ताने ए वाय पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.सहकारमधील राजकारणाचे पडसाद हे जिल्ह्याच्या राजकारणात पडतात हे सर्वांनाच माहित आहे.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडसाद हे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रखरतेने पडत आहेत. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळालं आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी मुश्रीफांना लांब करत भाजपमधील नेत्यांशी जवळीक साधली होती.