मराठा आरक्षणासाठी ६४ जणांचं बलिदान, जबाबदार कोण?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. दरम्यान गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या अनेक तरुणांनी नैराश्येतून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक म्हणजे मागील बारा दिवसात १६ जणांनी आत्महत्या केल्या असून आतापर्यंत ६४ जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. यात मराठवाड्यातील ४० जणांचा समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे लाखोंच्या संख्येने राज्यभर मोर्चे निघाले होते. सर्व मोर्चे शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. मात्र राज्यभर तरुणांच्या आत्महत्या सुरू झाल्या. शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज कायम मागास राहिला. चांगले गुण मिळवूनही आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन मिळत नाही. पुढे नोकरीतही हीच पद्धत आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून मराठा समजा नेहमीच लांब राहिला, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. यातून मराठा समाजामध्ये कमालीचं नैराश्य आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा तरुणांचं आत्महत्येचं सत्र सुरू झालं. दरम्यान यावेळी सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान सुनील कावळे यांनी आत्महत्या केल्यांनतर संपूर्ण महाराष्ट्रभर आत्महत्येचं लोन सुरू झालं आहे.

मराठा क्रांती मोर्चानंतर २५ जणांच्या आत्महत्या

काकासाहेब शिंदे, प्रमोद होरे, प्रदीप म्हस्के, उमेश एंडाईत, कारभारी शेळके, केशव साहेबराव चौधरी, किशोर हरडे, गणेश ननवरे, सुनील खांडेभराड, किरण कोलते, अनंत लेबडे, कचरू कल्याणे , गणपत आबादार, सुमित सावळसुरे, रमेश पाटील, तृष्णा माने, महादेव बाराखोते, अभिजित देशमुख, शिवाजी कुटे, मछिंद्र शिंदे, दिगंबर कदम, राहुल हावळे, एकनाथ पैठण, कानिफ येवले, विष्णु काळे

”आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नसून संविधानिक मार्गाने आरक्षणाचा मुद्दा सोडवू, त्यामुळे कोणी टोकाचं पाऊल उचलू नये”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. तरीही आत्महत्या सुरू आहेत.