केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणा जागी झाली असून राज्यासह देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून विदेशी विद्यार्थ्यांवर तपास यंत्रणेद्वारे करडी नजर ठेवण्यात येत आहे. इंटेलिजन्स ब्यूरोकडून विदेशी विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडून गोळा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यासह देशभरात विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दरवर्षी त्यात काही विद्यापीठांमध्ये वाढ तर काही विद्यापीठांमध्ये घट होताना दिसते. हे विद्यार्थी शिक्षण घेतल्यावर त्यांची सध्याची स्थिती नेमकी काय आहे? हे अनेकदा विद्यापीठांना माहिती नसते. शिवाय याबाबत तपास यंत्रणांकडेही माहिती नसते.
दरम्यान शिक्षण घेत असतानाच, त्यांची संपूर्ण माहिती घेत, त्यांच्या वास्तव्याबाबत तपास यंत्रणेकडून आता इत्तंबूत माहिती गोळा करण्याचे काम इंटेलिजन्स ब्युरोने सुरू केले आहे. या कामाला वेग आला असून प्रत्येक विद्यापीठांमधून अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत विद्यापीठातील एका बड्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला. मात्र, त्यांनी अधिक बोलण्यास टाळले.
शाहनवाज सापडल्याने खळबळ
शहरातील व्हीएनआयटीमध्ये शिकलेला आणि आयएसआयच्या मोड्युलवर काम करणारा शाहनवाज याला महिनाभरापूर्वी दिल्लीत अटक झाली. शिकताना तो रतलामच्या अल सुफा या देशविरोधी संघटनेशी जुळला असल्याची बाब समोर आली होती. शिवाय तो स्फोटके तयार करण्यात तरबेज असल्याचेही समोर आले होते. दरम्यान अशा प्रकारांवर नजर ठेवण्यासाठीही तपास यंत्रणांकडून आता त्या अनुषंगाने सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
तीन विद्यार्थ्यांचे होते देशात वास्तव्य !
विशेष म्हणजे, इराकला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा लोगो आणि अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा वापर करीत, नोकरीसाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे अनेक दिवस देशात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकाराने खळबळ उडाली होती.
स्वतः ला अपडेट करण्यासाठीहीआवश्यक प्रक्रिया
सुरक्षा यंत्रणेकडून अशाप्रकारे डाटा मिळवत, स्वतःला अपडेट करण्यावर भर देण्यात येत आहे. दूतावासाकडून याबाबत माहिती मिळत असली तरी, त्याबाबत स्वतंत्र माहिती घेत, तसा डेटाही तयार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.