राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी बेरजेचे राजकारण करण्याचा घाट घातला असल्याचे दिसून आले.आमदार जयंत पाटलांना शह देण्यासाठी त्यांचे वर्चस्व असलेल्या आणि वाळव्यातील ४८ गावांचा समावेश असलेल्या शिराळा मतदार संघामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन तावडे यांनी याचा मुहूर्त केला असल्याचे मानले जात आहे.
यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला पर्यायाने महायुतीला काँग्रेस आणि शरद पवार गटाशीच लढत द्यावी लागणार आहे. यासाठीची मोर्चेबांधणी सध्या सुरू असून राष्ट्रीय महासचिव तावडे यांचा सांगली दौरा हा त्याचीच परिणीती आहे, असे म्हणावे लागेल.
तावडे यांनी जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव आणि मिरज या चार विधानसभा मतदार संघाचा दौरा करत पक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. उर्वरित चार म्हणजेच वाळवा, खानापूर-आटपाडी, जत आणि सांगलीसाठी ते पुन्हा पुढील महिन्यात दौरा करणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह अन्य ठिकाणी मराठा मतदार भाजपपासून दूर जात असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले असून सांगलीची जागा भाजपने गमावली आहे. यामुळे मराठा समाज पुन्हा पक्षाकडे खेचण्यासाठी तावडेंचे नेतृत्व पुढे करून भाजपने बेरजेचे राजकारण करण्याचा घाट तर घातला नाही ना, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.