विमा योजना दवाखाना इमारती दुरुस्ती करा इचलकंरजी महापालिकेला निवेदन…

राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा दवाखाना इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने महापालिकेकडे केली आहे. शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिले.

यावेळी सुनील बारवाडे, आनंद कांबळे, अमर मगदूम, तैसिफ नंदीवाले, महेश काटकर, शहाबाज पटेल, आदी उपस्‍थित होते.
सध्या हा दवाखाना महापालिका मालकीच्या इमारतीत ४२ वर्षे सुरू आहे. येथे दररोज सुमारे २०० रुग्ण उपचारांसाठी येत असतात. दवाखाना असलेल्या या जीर्ण इमारतीच्या छतातून पावसाळ्यात पाणी गळते.

त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. त्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तीन ते चार रूमसह लगतच्या परिसरात शेडचे बांधकाम करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.