सांगलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जोरदार राडा…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज कऱ्हाड (जि.सातारा) येथे झाला. त्या मेळाव्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली.चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याला शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा, सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आज घेण्यात आला. या मेळाव्यासाठी पक्षाचे विभागीय संपर्क नेते आमदार जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी कानमंत्र देण्यात आला.मेळाव्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांच्यात पक्ष वाढीच्या प्रश्नावरुन आणि अन्य कारणावरुन आमदार जाधव यांच्यासमोरच जोरदार वादावादी झाली.

त्यानंतर त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. शिवसेनेच्या सांगलीतील विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी संबंधितांची मनधरणी केली. मेळाव्यात घडलेल्या प्रकाराला शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेच्या सांगलीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात झालेल्या राड्याचीच चर्चा जोरात सुरु आहे.