सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ…

सांगली जिल्ह्यात पाऊस कमीअधिक प्रमाणात सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत २१.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मात्र, धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील कर्नाळ रोडवरील आरवडे पार्क येथील तीन कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांपर्यंत पोहोचली आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी, अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी सुरू आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून सांगली येथील आयर्विन पूल सांगली २९.६ (४०) फूट तर अंकली पूल हरिपूर येथे पाणीपातळी ३३.७ (४५.११) फूट आहे.

संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन सांगली महानगरपालिकेने पूर पट्ट्यातील वस्त्यांमध्ये जागृती सुरू केली आहे. सध्या सांगली महापालिका क्षेत्रातील कर्नाळ रोडवरील आरवडे पार्क येथील तीन कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.दरम्यान, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, खानापूर आणि जत या भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे.