Sangli News : दुध व्यवसायात छुप्या मार्गाने सावकारी करून शेतकऱ्यांची लुट

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्ती विरोधात शासन स्तरावरून कारवाई करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून होवू लागली.

सांगली : एकीकडे दूधाचे दर कमी झाले असताना वाळवा तालुक्यातील उत्तर भागात फिरून दूध गोळा करणारे गवळी पाच पॉइंट ते एक फॅट कमी करून शेतकऱ्यांना शासन नियमापेक्षा एक रुपया जादा दर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत आहेत.

तर बाजारात सरकीचा दरम्यान १२७० रुपये असताना १३८० रुपये विक्री करून पोत्यामागे ११० रुपये जादा तर गोळी पेंडीचा विक्री दर १४५० रुपये असाताना १७५० रुपये विक्री करून ३०० रुपये जादा वसूल करीत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्ती विरोधात शासन स्तरावरून कारवाई करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून होवू लागली आहे.

मार्च ते सप्टेंबर अखेरचा काळ दुध व्यवसायाचा कृषकाळ समजला जातो. या काळात दुध संकलन घटून चाळीस टक्क्यावर येते. दुध संकलनात याकाळात स्पर्धा वाढीस लागलेली असते.

गेल्या तीन महिन्यांत गाईच्या दुधाचे दर तीन रुपयांनी कमी झाले असताना शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच फॅटमारी करून जादा दराचे आमिष दाखवले जात आहे. तर पशुखाद्यात मोठ्या प्रमाणात लुट सुरू आहे.

गायीच्या दुधास संकलन म्हणून नव्वद पैसे तर म्हैशीच्या दुधास एक रुपया संकलन दुध संघाकडून दिले जाते. मग दुध संकलन करणारे गवळी मिळणाऱ्या संकलनाच्या रकमेतून नोकर पगार, वाहतूक खर्च भागवून एक रुपया जादा दर देणार कसे? याचाच अर्थ फॅटमारी करून शेतकऱ्यांची बोटे शेतकऱ्यांच्या डोळ्यात घालून लुटमारी करण्याचा उद्योग सुरू असल्याचे दिसून येते.