माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इचलकरंजीबाबत वादग्रस्त वक्तव्य….

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आहे, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेधाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन पाटील सांगली येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशिल माने यांचे अभिनंदन केले.

धैर्यशिल माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हातकणंकले पूर्वी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इचलकरंजीचा लोकसभा मतदारसंघ हा पाकव्याप्त काश्मीर म्हटला पाहिजे. आजूबाजूला सगळी परिस्थिती वेगळी होती. आजूबाजूला सर्व प्रतिकूल शक्ती होत्या. अदृश्य शक्ती काम करत होती. अशा परिस्थितीत धैर्यशिल माने यांनी विजय प्राप्त केला. त्यांनी वादळात दिवा लावला असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो.

हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना माज आलाय असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, सत्तेचा माज आलाय यांना. महाराष्ट्रातील भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणत आहेत. अशी वक्तव्य करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न आहे. पण, हा माज जास्त काळ राहणार नाही. राज्याची जनता त्यांना जागा दाखवेल आणि त्यांचा माज उतरवेल.