नोकरीसाठी आर्थिक फसवणूक झाल्यास तक्रार करा, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन!


अनुकंपा तत्वाखाली महानगरपालिकेत कर्मचारी भरती करण्याच्या कामाला गती येत प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांकडून आर्थिक शोषण करण्यात येत असल्याची गंभीर बाब महानगरपालिका प्रशासनासमोर आल्यानंतर सतर्क झाले आहे. या संदर्भात आर्थिक स्वरुपाची मागणी आल्यास संबंधित उमेदवारांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तत्कालीन पालिका सेवेतअसतांना अनेक कर्मचारी मयत झाले. त्यांच्या वारसांना आता अनुकंपा तत्वाखाली लकेत नियुक्ती दिली जाणार आहे. त्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली आहे. सुमारे ७५ पात्र उमेदवार लवकरच महापालिका सेवेत दाखल होणार आहेत. त्यांच्या कागदपत्राच्या पूर्ततेची पडताळणी मंगळवार ता. २६ रोजी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सर्वच उमेदवारांना महापालिका सेवेत नियुक्ती दिली जाणार आहे. नियुक्ती करण्यात येणारी सर्व पदे महापालिका आकृतीबंधामध्ये
मंजूर आहेत. त्यामुळे कोणताही अडथळा येणार नाही.

आयुक्तांच्या मंजुरीनंतर सर्वांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. एकिकडे प्रशासनाकडून ही सर्व प्रक्रिया सुरु असतांना दुसरीकडे बाह्ययंत्रणा संबंधित उमेदवारांकडून विशिष्ट रकमेची मागणी करीत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची आर्थिक शोषण होवू नये, अथवा त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये, यासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. याबाबत कोणी रकमेची मागणी केल्यास पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.