आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला चिपळुणातून दुचाकीने निघालेल्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी – दिघंजी येथे घडली. या अपघातात तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला.तर त्याच्यासोबत असलेला शहरातील पेठमाप गणेशवाडी येथील तरूण गंभीर जखमी झाला आहे.
रवींद्र बाळू मोरे (४२, पेढे, मोरेवाडी, चिपळूण) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच त्याच्या सोबत असलेला सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी, चिपळूण) हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविंद्र मोरे आणि सुधीर निवाते हे दोघेही मित्र असून ते दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी वारीला जात होते. यावर्षी त्यांनी आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी दुचाकीने पंढरपूरला जाण्याचा बेत केला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने पंढरपुरला निघाले होते. पंढरपूर मार्गावरील आटपाडी तालुक्यातील दिघंजी येथून जात असताना कोणत्या तरी अज्ञात वाहनाच्या धडकेने भिषण अपघात झाला.
यामध्ये रविंद्र मोरे हा दुचाकीसह रस्त्याबाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच निवाते याच्या पायालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ सांगली येथील रूग्णालयात नेऊन उपचार सुरू केले आहेत. या अपघातात दुचाकीचे पुढील चाक निखळले असून मोठे नुकसान झाले आहे. यावरून या अपघाताची भिषणता लक्षात येते.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूणातील त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी ४ वाजता सांगली येथे धाव घेतली. तसेच पंढरपूर येथे गेलेले काही वारकरी देखील घटनास्थळी पोहोचले. पेढे येथील रविंद्र मोरे हे सोनार व्यावसायीक असून पानगल्ली येथील खेराडे कॉप्लेक्स येथे त्यांचे दुकान आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तसेच सुधीर निवाते यांचा बाजारपेठेत चहाचा व्यवसाय आहे.