एक रुपयात पीक विमा भरण्यास मुदतवाढ ३१ जुलै अखेरपर्यंत….

सांगोल्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची सोमवार दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. यामध्ये – मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.

शेतातील जमिनीला वापसा येईल त्या पद्धतीने शेतकरी आपल्या पिकाची पेरणी उरकून घेण्याच्या नादात असल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन केंद्रापर्यंत पोहोचणे व पिक विमा उतरवणे याकडे दुर्लक्ष झाले होते. यासह विविध योजनांसाठी लाभार्थी महा-ई-सेवा व ऑनलाइन केंद्रावर गर्दी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी महा-ई-सेवा व ऑनलाईन केंद्रावरून रेशन कार्ड नाव वाढवणे कमी करणे, ऑनलाइन दाखले इतर बाबीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी शेतकरी वर्गातून मागणी होत असताना कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.