लाडक्या बहिणीला ओवाळणी! रक्षाबंधनाला खात्यात पैसे जमा होणार

 महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. याचसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.  अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.