दोन्ही नेत्याचा भेटीने राजकीय चर्चांना उधाण….

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांची अनगरमध्ये जाऊन भेट घेतली.लोकसभा निवडणुकीपूर्वीही विजयदादांनी राजन पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, असं मोहिते पाटील आणि राजन पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही कौटुंबीक भेट होती, असे त्यांनी सांगितले.माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत, तर मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवत माढ्यातून विजय मिळविला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले जुनी सहकारी राजन पाटील आणि बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांची भेट घेतली होती. हे सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते. त्या वेळी जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होते.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही विजयसिंह मोहिते पाटील यांनी राजन पाटील यांची भेट घेतली होती. त्या भेटीची त्यावेळी चर्चा झाली होती. विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडी प्रणित काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधान सभा मतदारसंघातून सर्वधिक लीड मिळालं आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून विजय मिळविल्यानंतर ते प्रथमच अनगर येथे राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी आले होते. विशेष म्हणजे ही भेट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला काही वेगळा चमत्कार घडणार का, याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झालेले विजयदादा जिल्ह्यातील राजकारणाची फेरमांडणी करत असल्याचे दिसून येत आहे. माळशिरस, सांगोला, करमाळा या मतदारसंघात त्यांनी बऱ्यापैकी राजकीय गणिते जमवली आहेत. जिल्ह्यातील इतर भागातही त्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जिंकलेले मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार आहे.