सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी वाहून आल्याने ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते.ग्रामीण भागात पाण्याचे नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाणीपुरवठा होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.
पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही साथीचा उद्रेक होऊ नये, याबाबत आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून जलजन्य व कीटकजन्य साथरोगांच्या उद्रेकास निश्चितच आळा बसू शकेल, नागरिकांना निर्जंतुक व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या ग्रामपंचायतीच्या मुलभूत कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या गावांना जोखीमग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात यावे, तसेच जोखीमग्रस्त गावांची यादी जिल्हा स्तरावर देण्यात यावी, असे सांगण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले.