शिंदे सरकारने ४० दिवसात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो म्हणून संबंध मराठा समाजाची दिशाभूल करुन वेळकाढूपणा करत असल्यामुळ राज्य सरकारच्या निषेधार्थ एखतपूर येथील सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक प्रेताचा अंत्यविधी केला. त्याचप्रमाणे गणेश इंगोले व संजय आवताडे यांनी आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच सोमनाथ इंगोले, रमेश घारगे, अशोक घाडगे, दादासो इंगोले, विशाल जाधव या युवकांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला.
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषण करीत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कोणताच निर्णय देत नसल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ एखतपूर ता. सांगोला येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाची प्रेत यात्रा काढण्यात आली. प्रतिकात्मक प्रेत यात्रेची प्रतिकात्मक अंत्यविधीमध्ये रूपांतर करुन प्रतिकात्मक प्रेताचा अंत्यविधी करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्ते यांचा ही निषेध करण्यात आला.
प्रेत यात्रा दरम्यान घोषणाने संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. मनोज जरांगे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, अजित पवारला झालय काय, डेंग्यूने चाललाय काय.. अशा घोषणा देऊन प्रेत यात्रा शहरातून काढून स्मशान भूमित नेऊन प्रतिकात्मक पुतळ्याला अनि डाव देऊन दहन आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला खोटी कारणे देत आहे. त्यामुळे आम्ही सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी केला, असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.