विशाळगड येथे हिंसा करणाऱ्यावर कारवाई कराइस्लामपूरमध्ये मुस्लीम धर्मियांची मागणी

विशालगड येथे आंदोलनात हिंसक वळण लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी समस्त इस्लामपूर मुस्लीम समाजाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास आणि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना देण्यात आले. निवेदनात दोषी दंगलखोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची ओळख पटवून तत्काळ गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई करावी. विशाळगड अतिक्रमण आणि दर्गा मशिदीचा काही संबंध नसताना प्रार्थनास्थळावर दगडफेक करणाऱ्या हल्ले करणारे व मुस्लीम लोकांवर आणि त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करावी.

पोलिसांना हल्ल्याची पूर्वकल्पना न दिल्यामुळे विशेष पोलीस निरीक्षक व कोल्हापूर जिल्हा अधीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, यापुढे विशाळगड दर्गा येथे कायमस्वरूपी वरिष्ठ पोलीस अधिकारीची नेमणूक करावी. रवींद्र पडवळ व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. यावेळी मकसुद भादी, मोहसीन पटवेकर, अमीर हवलदार, आयुब पठाण, साद दिवाण, शाकीर मोमीन, अब्दुल मोमीन, सलमान मोमीन, जोहर जमादार, फिरोज गोलंदाज, सद्दाम पटेल यांच्यासह मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.