इस्लामपूर शहरातील होळकर डेअरीपासून सावकार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चर खोदून हा रस्ताच बंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू असतानाच हा प्रकार घडला. हा रस्ता कोणी बंद केला, याची पालिकेलाही माहिती नाही. याबाबत अद्याप पालिकेकडे तक्रार नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. हा रस्ता सावकार कॉलनीतून पेठ सांगली रस्त्याकडे जातो. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हा रस्ता खराब झाल्यामुळे सध्या खडीकरणाचे काम सुरू होते.
हे काम सुरू असतानाच दोन दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी अज्ञातांनी रस्त्यावर चर मारून हा रस्ताच बंद केला आहे. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच पंचाईत होत आहे. याबाबत नगरपालिकेत चौकशी केली असता, रस्ता बंद केल्याची अद्याप कोणाचीच तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. या रस्त्याच्या हद्दीचा वाद सुरू आहे. त्यातूनच हा रस्ता बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. नगरपालिका निधी खर्च करून या रस्त्याची दुरुस्ती करत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची जबाबदारीही पालिकेची आहे. पालिकेने तो खुला करावा, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.