हातकणंगलेतील ५९ कोटींच्या निधीबाबत दिशाभूल नको!माणगावचे सरपंच राजू मगदूम यांची टीका

हातकणंगले तालुक्यातील तेरा गावांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी ३५ किलोमीटरची रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांमुळे हा निधी मिळत असताना, आमदार राजू आवळे यांचे कार्यकर्ते निधीबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध करत आहेत अशी टीका माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी केली.

साजणी येथील नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. सरपंच मगदूम म्हणाले, ग्रामीण भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दर्जा उन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन बॅच एक या योजनेस मंजुरी दिली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी १३ गावांतील ३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे ५९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. आमदार आवाडे यांनी नागरिकांना मागणी केल्याप्रमाणे गरज ओळखून या कामांना न्याय दिला. विकासकामांचे राजकारण न करता ही कामे तात्काळ होण्याकरिता मदत करावे, असे आवाहन जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले यांनी केले.