पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी! कोल्हापूरकरांची वाढली धाकधूक

कोल्हापूर जिल्ह्यात काल, रविवारी सकाळपासून धुवाधार पावसामुळे पुराचे पाणी वाढू लागले आहे. आज, सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सायंकाळी तीन ठिकाणी पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आज, सकाळपासून शहरात पावसाने उघडीप घेतली. काल, रविवार जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. एकसारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.