पाणंद रस्त्यांची दुरावस्था! शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीघाट परिसरात पूर्व व पश्चिम भागात सुमारे १४ पाणंद रस्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा पावसाच्या सुरुवातीपासूनच पाणंद रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करताना मोठ्या अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चिखल व पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

शेतीच्या कामासाठी येणारे अत्यावश्यक साहित्य, खते व बियाणे वेळेवर पोहोचण्यास अडचणी येत आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांना बैल, वाहनांसह पायीच प्रवास करावा लागत आहे. पिके वेळेवर बाजारपेठेत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या पाणंद रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे नष्ट झाले आहेत. तसेच पावसाने रस्ते चिखलाने भरलेले आहेत.

पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण कामाची तत्काळ सुरुवात करण्याची मागणी कायम आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सतत पत्रव्यवहार तसेच आंदोलने करूनही समाधानकारक कार्यवाही होत नाही. आता शेतकऱ्यांचा संताप आणि संयम सुटला असून, यंदा पावसाळ्यात तरी या समस्या सोडवण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.