सांगोल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची आमदार शहाजीबापूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

सांगोला तालुक्यातील वाहनधारकांना वाहन चालक या परवान्यासाठी व इतर वाहनांच्या कामांसाठी ६० किमीचा प्रवास करून अकलूजला यावे लागते. तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील वाहन धारकांना सोलापूरला जावे लागते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहन परवान्याची कामे करण्यास अडचणी येतात. गर्दीमुळे कामे न झाल्यास वाहन चालकांना निराशेपोटी परत जावे लागते. त्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विचार व्हावा अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सोलापूर व अकलूज येथील असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामकाजाचा अधिक भार असल्याने या ग्रामीण भागातील लोकांची वेळेत कामे पूर्ण होत नाहीत.

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील लोकांना सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तर सांगोल्यातील वाहनधारकांना अकलूज येथील कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

सांगोला तालुक्यात उपप्रादेशिक कार्यालय नसल्याने वाहन चालक परवाने व तत्सम कामासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाहन चालकांना सोलापूरला जावे लागते. तर सांगोला तालुक्यातील वाहन धारकांना अकलूज येथे ६० किमीचा प्रवास करावा लागत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी आवश्यक असणारी जागा सांगोला नगरपालिकेकडे आरक्षीत असून उपलब्ध आहे.

त्यामुळे पंढरपूर, सांगोला मंगळवेढा या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्र सांगोला येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगोल्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.